भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल; जाणून घ्या काय घडलं?

Zoom In Zoom Out Read Later Print

कल्याण पूर्वेचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. सर्वात खळबळजनक बाब म्हणजे हिललाईन पोलीस ठाण्यातच हा प्रकार घडला.

या गोळीबारात महेश गायकवाड गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. गोळीबार प्रकरणानंतर गणपत गायकवाड यांना पोलिसांनी अटक केली आहे. यानंतर आता गणपत गायकवाड यांच्याविरोधात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उल्हासनगर-हिल लाईन पोलीस ठाण्यात गणपत गायकवाड यांच्याविरोधात ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कल्याणमधील द्वारली गावातील जमीन मालकाला जातीवाचक शब्द वापरल्याने आमदार गणपत गायकवाड यांच्यासह इतर सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जागेच्या वादातून पोलीस ठाण्यात भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख महेश गायकवाड आणि त्यांचे सहकारी राहूल पाटील यांच्यावर पोलिस ठाण्यात गोळीबार केला. त्या जागेच्या वादावरूनच भाजप आमदारासह आठ जणांविरोधात ॲट्रोसिटीचा गुन्हा जागा मालकाच्या तक्रारीवरुन दाखल करण्यात आला आहे.

आमदार गायकवाड यांच्यासह सात जणांवर गुन्हा दाखल

आमदारांसह सात जणांनी जागा मालक मधूमती एकनाथ जाधव आणि त्यांच्यासोबत असलेल्या महिलांना जातीवाचक शिवीगाळ केली होती. आमदार गणपत गायकवाड यांनी जातीचा उल्लेख करत ‘तुम्ही कधी सुधारणार नाही तुम्हाला आम्ही कधी पुढे जाऊ देणार नाही. तुमची जमीन घेतल्याशिवाय सोडणार नाही. तुम्ही तुमच्या जमिनीकरता कोणत्याही कोर्टात जा,’ असे म्हंटले होते. त्यानंतर आता आमदार गायकवाड यांच्यासह जितेंद्र पारीख, वि्ठठल चिकणकर, शिवाजी फुलोरे, सौरभ सिंग, छोटू खान, चंद्रकात ओल, मंगेश वारघेट यांच्या विरोधात ॲट्रोसिटी अॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे आता गणपत गायकवाड यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

अजून पहा

नवे फोटो